Wednesday, March 05, 2014

फुटबॉल वर्ल्डकपची उलट गणती सुरू

फिफा फुटबॉल वर्ल्डकप आता बरोबर ९९ दिवसांवर आला आहे. १२ जून ते १३ जुलै या कालावधीत ब्राझीलमध्ये हा वर्ल्डकप रंगेल.



फिफा फुटबॉल वर्ल्डकप आता बरोबर ९९ दिवसांवर आला आहे. १२ जून ते १३ जुलै या कालावधीत ब्राझीलमध्ये हा वर्ल्डकप रंगेल. जगभरात क्रीडा स्पर्धामध्ये सर्वात मोठी प्रसिद्धी मिळवण्याचा मान हा नेहमीच फुटबॉल वर्ल्डकपकडे राहिला आहे. यंदा ब्राझीलला दुस-यांदा वर्ल्डकप आयोजनाचा मान मिळाला आहे. त्यानिमित्ताने वर्ल्डकपच्या तयारीवर आणि त्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न..
यजमान आणि वाद
ब्राझीलला यजमानपद मिळाल्यापासून तेथील सरकारला ब्राझीलवासियांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तेथील ढासळलेली अर्थव्यवस्था पाहता वल्र्डकपच्या तयारीसाठी होणारा खर्च हा अर्थातच तेथील लोकांच्या रागाचे कारण आहे. कारण २०१६मध्ये ब्राझीलमध्ये रिओ ऑलिंपिकही होणार आहे. त्या सर्वाचे पडसाद गेल्यावर्षी कन्फेडरेशन कपदरम्यानही पाहायला मिळाले होते. सामन्याच्याठिकाणी निदर्शने, जाळपोळ करून ब्राझीलवासीय त्यांचा राग व्यक्त करत होते. या सर्व घडामोंडींमध्ये काही स्टेडियमच्या बांधकामांनाही उशीर झाला. मात्र ती वेळेत पूर्ण होतील असे आश्वासन देण्यात आले आहे. ब्राझीलच्या अध्यक्षा दिल्मा रोसेफ यांनी स्वत: सर्व तयारीमध्ये लक्ष घातले आहे. जोडीला हवाई मार्ग हादेखील चर्चेचा विषय आहे. ब्राझीलमधील १२ शहरांमध्ये होणा-या या स्पर्धेच्या ठिकाणांमध्ये फार मोठे अंतर आहे. अनेक रेल्वे स्टेशनांचाही कायापालट करण्याचे काम सुरू आहे. त्यातच हवामानातील फरकही फुटबॉलपटूंच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहे.
स्टारवर विशेष लक्ष
पेले, मॅरॅडोना यासारखे माजी दिग्गज ज्याप्रमाणे त्यांच्या देशाला वर्ल्डकप जिंकून देणारे स्टार ठरले तो मान सध्याचे स्टार लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना मिळालेला नाही. यंदा दोघांचेही लक्ष्य त्यांच्या देशाला वर्ल्डकप जिंकून देण्याचेच आहे. मेसी अर्जेटिनाचे आणि रोनाल्डो पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करेल. त्यातच दोघांनीही स्पॅनिश ला-लिगा आणि यूएफा चॅँपियन्स लीगमध्ये प्रभावी कामगिरी करत फॉर्म राखला आहे.
नेयमार प्रभावी ठरणार?
गेल्यावर्षी ब्राझीलला फिफा कन्फेडरेशन कप जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिलेला नेयमार यंदा पेलेंचा कित्ता गिरवेल असा अंदाज आहे. छोटय़ा चणीच्या नेयमारची गुणवत्ता ओळखून त्याला बार्सिलोनासारख्या अव्वल क्लबने गेल्यावर्षी करारबद्ध केले. नेयमार हा मेसी आणि रोनाल्डोपेक्षाही वर्ल्डकपमध्ये सरस ठरेल असे फुटबॉलमधील जाणकारांचा अंदाज आहे.
स्पेन वर्ल्डकप राखणार?
स्पेनने २००८मध्ये युरो कप, २०१०मध्ये वल्र्डकप आणि २०१२मध्ये युरो कप जिंकून दबदबा राखला. स्पेन सातत्याने फिफा रॅँकिंगमध्ये अव्वल स्थान टिकवून आहे. मात्र गेल्यावर्षी कन्फेडरेशनच्या अंतिम फेरीत ब्राझीलविरुद्ध त्यांचा कस लागला होता. त्यावेळी यजमानांचे आक्रमण भेदणे स्पेनला जमले नव्हते. ते पाहता स्पेनसमोर मुख्य आव्हान असेल ते यजमान ब्राझीलचे.
लक्षवेधी
>आठ ग्रुप, ३२ देशांचा सहभाग, एकूण ६४ सामने, १२ ठिकाणे. त्या ठिकाणांमध्ये रिओ दि जानेरो येथील मॅरॅकॅना हे मुख्य आकर्षण असलेले स्टेडियम. त्याच स्टेडियमवर अंतिम लढत रंगेल.
>वर्ल्डकपमध्ये प्रथमच गोल-लाइन तंत्रज्ञानाचा वापर
>वॅनिशिंग स्प्रेचाही वर्ल्डकपमध्ये प्रथमच होणार वापर. त्यानुसार फ्रीकीकची जागा रेफ्री आखून देणार. हा पाण्याचा स्प्रे एका मिनिटांत अदृश्य होतो.
>फिफा वर्ल्डकप ट्रॉफी टूर रविवारीच (दोन मार्च) पूर्ण झाली. या टूरद्वारे जगभरातील ८८ देशांनी वर्ल्डकप चषकाची झलक पाहिली. भारतात कोलकात्यातही वर्ल्डकप चषकाने भेट दिली होती.
>आतापर्यंत या वल्र्डकपची जवळपास चार लाख ७३ हजार तिकिटे जगभरात विकत घेतली गेल्याचे फिफाकडून जाहीर झालेली आकडेवारी सांगते. यजमान असल्याने >ब्राझीलला सर्वाधिक तिकिटांचा मान मिळाला. एकूण ३,३३४,५२४ तिकिट स्पर्धेसाठी आहेत. त्यात व्हिआयपींचाही कोटा आहे.
>फुलेको हे वर्ल्डकपचे बोधचिन्ह (मॅस्कॉट) असेल. ब्राझीलमधील ५ ते १२ वयोगटातील मुलांना समोर ठेवून हे बोधचिन्ह ठेवण्यात आले आहे.
>आदिदास ब्राझुका हा मुख्य बॉल असेल.
>२०१०च्या वर्ल्डकपला शकिराचे ‘वाका वाका’ हे मुख्य गाणे होते. यंदा पितबूलने गायलेले ‘वुई आर वन’ हे गाणे मुख्य आहे.
>भारतात स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी सिक्स वाहिनीवर दिसेल.

आय लीग सामने `फिक्स’ करण्यासाठी ऑफर्स

क्रिकेटप्रमाणे भारतीय फुटबॉललाही `मॅचफिक्सिंग’चे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत असून मलेशियातील बेटिंग टोळीने आय लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने फिक्स करण्यासाठी भारतीय क्लबशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने मंगळवारी सांगितले. यामुळे भारतीय फुटबॉल फेडरेशनला भ्रष्टाचारविरोधी युनिट नेमण्यासाठी पाऊल उचलावे लागले आहे.

  ?


या संदर्भात सट्टेबाजांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत झालेल्या फिफा इंटरपोल इंटेग्रिटी इन स्पोर्ट्स कार्यशाळेवेळी काही क्लब्सनी सांगितले होते आणि अ. भा. फुटबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष सुब्रता दत्ता यांनी त्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती. `ही अत्यंत चिंताजनक बाब असल्यानेच फिफाने इंटरपोलला येथे पाठविले आणि मॅचफिक्सिंग, बेटिंग व इतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी योजावयाच्या उपायांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बराच पैसा खर्च केला. फिफाने जर इतक्या गांभीर्याने त्याची दखल घेतली असेल तर ती निश्चितच चिंताजनक बाब आहे. एआयएफएफनेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय फेडरेशनने प्रामाणिक अधिकाऱयाच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी युनिट नियुक्त करण्याचा प्रस्ताव मी मांडला आहे. फेडरेशनची कार्यकारी समिती त्यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. सर्व क्लब्सना असे प्रकार ओळखण्याचे, त्याला विरोध करण्याचे आणि त्याबाबत त्वरित माहिती देण्यास सांगण्यात आले आहे,’ असे दत्ता यांनी सांगितले. किती क्लब्सशी सट्टेबाजांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची नावे सांगण्याचे त्यांनी टाळले.
गेल्या वर्षी मुंबई एफसीचे उपाध्यक्ष अतुल बग्दामिया यांना एका मलेशियन व्यक्तीकडून फोन आला होता. या क्लबने मलेशियात मित्रत्वाचे सामने खेळावेत आणि त्यांचा सर्व खर्च आपण करण्याचा प्रस्ताव त्याने बग्दामिया यांच्यासमोर ठेवला होता. त्यानंतर त्याने आय लीगमधील सामने फिक्स करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. `हा प्रकार लक्षात आल्यावर त्यात मला रस नसल्याचे मी त्याला त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले आणि फोन ठेवला. मला त्या व्यक्तीचे आता नावही आठवत नाही. पण तो मलेशियन होता,’ असे बग्दामिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. एआयएफएफला त्याबाबत लगेचच का कळविले नाही, असे विचारता ते म्हणाले, त्यांची ऑफर मी फेटाळून लावल्याने हे प्रकरण तिथेच संपले असे मला वाटले. एआयएफएफने भ्रष्टाचारविरोधी पथकात जबाबदार अधिकारी नियुक्त करणार असल्याचे आम्हाला आता सांगण्यात आले आहे. असे प्रकार यापुढे घडल्यास या अधिकाऱयाला त्याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. हे काम तसे सोपे झाले आहे. कारण कोणाशी संपर्क साधायचा हे प्रत्येकाला माहीत झालेय. कार्यशाळा झाल्यानंतर जागृती वाढली असल्याने यापुढचे काम सोपे झाले आहे,’ असे ते म्हणाले.
गेल्या महिन्यात मलेशियातील दुय्यम लीगमधील क्लबच्या पाच खेळाडूंवर व  संघाच्या तीन पदाधिकाऱयांवर मॅचफिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये एस. श्रीशांतने स्पॉटफिक्सिंग केल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. 

Thursday, February 13, 2014

इंडियन फुटबॉल भुतिया के वजह से है यार...

'बायचुंग भुतिया म्हणजे देवाने भारतीय फुटबॉलला देलेली जणू एक भेटच आहे', भारताचे माजी ऑलिम्पियन फुटबॉलपटू आय.एम. विजयन यांनी भुतियाचे कौतुक करताना हे उद्गार काढले होते. आज रात्र, रात्र जागून इंग्लिश प्रीमियर लीग व चॅम्पियन्स लीग बघणाऱ्या भारतीय फुटबॉल प्रेमींना युरोपियन फुटबॉल अगदी तोंडपाठ असेल. या नव्या पिढीला भारतीय फुटबॉलविषयी छेडले तर त्यांचे चेहरे पडतात. ते भारतीय फुटबॉलवर टीका करतील, पण एक प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून हमखास बाहेर पडेल : 'इंडियन फुटबॉल भुतिया के वजह से है यार... आपली टीम म्हणजेच भुतिया...' या मतांवरूनच भुतियाचे महत्त्व आपल्याला कळेल. 




भारतीय फुटबॉलमधील हे एकमेव नाव सध्याच्या जनरेशनला माहिती असेल; म्हणूनच मुंबईतील कुपरेजवर भुतियाच्या क्लबचा सामना असेल, तर त्याचे पाठिराखे हटकून उपस्थिती लावतात.क्रिकेटपटूंसारखे कोट्यवधी चाहते त्याला लाभले नसतील, पण खास त्याचा सामना बघायला स्टेडियमच्या बाहेर रांगा लागतात हेही नसे थोडके. भारताचे माजी प्रशिक्षक बॉब हौटन यांनी तर भुतियाची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली होती. 
सिक्कीममधील नामची गावच्या या खेळाडूच्या फुटबॉल कौशल्याविषयी दुमत नाहीच; पण तो एक उत्तम कर्णधारही ठरला हे आवर्जून नमूद करायला हवे. आपल्या सहकाऱ्यांना स्फूर्ती देतो, तोच खरा लीडर असतो, भुतिया असाच आहे. बरं हे नेतृत्व फक्त मैदानापुरते मर्यादित नाही. तिबेटियन्सना पाठिंबा दर्शवत तो २००८ बीजिंग ऑलिम्पिकच्या टॉर्च रिलेमध्ये भाग घेण्यास नकार देतो, तेव्हा त्यांची धाडसीवृत्ती अन् निर्णयक्षमतेचा अंदाज येतो. त्याची लीडरशीप पुन्हा एकदा दिसते. 
खेळ व राजकीय मुद्यांना हकनाक एकत्र आणण्यात काय अर्थ आहे, असे सांगत अनेक जाणकारांनी या फुटबॉलपटूवर टीका केली, पण भुतियाने त्यांना शांतपणे उत्तर दिले : 'ऑलिम्पिकमध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व करत असतो, तर गोष्ट वेगळी होती, पण संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नसताना फक्त टॉर्च रिलेमध्ये माझे भाग घेणे बरे दिसत नाही'. 
जागतिक फुटबॉल रँकिंगमध्ये भारतीय संघ शंभराव्या क्रमांकावरही आलेला नाही, र्वल्डकपमध्ये पात्र ठरण्याची गोष्ट तर दूरच राहिली, त्यातच अंतरगत राजकारण आलेच. अशा नकारात्मक वातावरणातही भुतियाचे खेळावरील प्रेम व श्रद्धा कमी झाले नाही. शंभरपेक्षा जास्त सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव खेळाडू! आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे शंभर सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रम मोजक्या खेळाडूंनाच जमलाय.



युरोपातील दुसऱ्या इंग्लिश डिव्हिजनचे सामनेही हा पठ्ठ्या खेळलाय. १९९९ ते २००२ दरम्यान भुतियाने एफसी बरी या क्लबचे प्रतिनिधित्व केले. आज युरोपातील क्लबमध्ये खेळण्यास उत्सुक असलेल्या सुनील चेत्रीचे आपण खूप कौतुक करतो, पण भारतीय खेळाडूने युरोप खेळण्याची मुहूर्तमेढ भुतियाने केलीय, हे मात्र आपण विसरतो. सुनील, सुब्रत पॉल, गौरमांगीसिंग, अन्वरअली, स्टीवन डायस यांना इंग्लिश क्लब्स ट्रायल्ससाठी बोलावतात, ते भुतियाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्यानेच हे कायम लक्षात ठेवायला हवे. 
मागे आफ्रिकेतील लहान मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभारण्यासाठी एका चॅरिटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. 'गोल फॉर आफ्रिका' या सामन्यात झिदान, बल्लाक, कॅनावोरा, सीडॉर्फ, एडगर डेव्हिस सारख्या फुटबॉलपटूंच्या खांद्याला खांदा लावून भुतिया खेळला, तेव्हा साऱ्या भारतीयांची छाती गर्वाने भरून आली. 'सुपर' नावाच्या एका अरब मासिकाने भुतियाला सवोर्त्तम आशियाई खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन दिले. त्याची अंतिम पाच जणांमध्ये निवड झाली नाही, पण एवढी मजल भारतीय फुटबॉलपटूला मारता आली हे विशेष. 
१९९२मध्ये नवी दिल्लीत झालेल्या सुब्रतो कपमधून चमक दाखवणाऱ्या बायचुंगने मीडियाचे लक्ष वेधून घेतले. साईच्या गँगटोक सेंटरचे तो प्रतिनिधित्व करत होता. ही सुब्रतो कप स्पर्धा, १६ वर्षांखालील राष्ट्रीय संघ व १६ वर्षांखालील आशियाई संघातील कामगिरीच्या जोरावर कोलकात्याताचा सर्वात मोठा क्लब इस्ट बंगालने भुतियाशी करार केला. १९९५मध्ये फगवाड्याचा जेसीटी संघाने भारताच्या या स्टार फुटबॉलपटूला करारबद्ध केले. याचवषीर् तो राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला. १९९७मध्ये तो पुन्हा इस्ट बंगालकडे परतला, पण यावेळी एक यशस्वी, स्टार फुटबॉलपटू म्हणून! या पठ्ठ्याच्या कामगिरीतील सातत्य पाहून १९९८-९९मध्ये इस्ट बंगालच्या संघव्यवस्थापनाने भुतियावर कर्णधारपदाची धुरा सोपवली. २१ वर्षांचा पोरकट, पण खेळाडू म्हणून परिपूर्ण भुतिया सर्वात लहान वयात कर्णधार झालेला पहिला खेळाडू. पुढील काही वर्षात त्याने मोहन बागानकडे कूच केली, पण तो पुन्हा इस्ट बंगालकडे परतला. २००९ हे वर्ष मात्र भुतियासाठी चांगले गेले नाही. एका डान्स रियालिटी शोसाठी तो तारखा देऊन बसला. यामुळे खेळाच्या सरावाकडे दुर्लक्ष झाले. काही सामन्यांमधून त्याने माघार घेतली. परिणामी बागानने भुतियाला सहा महिन्यांसाठी निलंबित केले. बायचुंगने यातून सावरत पुन्हा इस्ट बंगालकडे परतला. 
फुटबॉलमधील या 'एकलव्याला' १९९८मध्ये अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २००८मध्ये तो पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरला. भुतियाच्या कल्पक नेतृत्वाखाली भारताने तीनवेळा दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा जिंकली, तर २००७ व २००९मध्ये मानाच्या नेहरू कपवर नाव कोरले. भुतिया व भारतासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला तो एएफसी चॅलेंज कपचे जेतेपद. २००८मध्ये भारत ही स्पर्धा जिंकलाच, पण या विजयामुळे आपला आशिया कपमध्ये सहभागी होण्याचा मार्गही मोकळा झाला. १९८४नंतर प्रथमच भारत आशिया कपसाठी पात्र ठरल्याने आनंदाच्या भरात टी-शर्ट दातात पकडून मैदानाला फेरी मारणारा भुतिया आजही आठवतो. त्याचा झंझावात भारतीय संघाला अशीच स्फूर्ती देईल, असे वाटले होते, पण दुखापतींनी साराच विचका केला. 

Thursday, February 06, 2014

फुटबॉलप्रेमी गांधीजी....

दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये मोहनदास करमचंद गांधी महत्त्वाची भूमिका बजावली.



दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीयांच्या गटामध्ये एका तरुण, दक्षिण आफ्रिकेत फारशा परिचित नसलेल्या एका वकिलाचा समावेश होता आणि ते होते मोहनदास करमचंद गांधी. मिशीगन विद्यापीठात आफ्रिकेच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या पीटर अ‍ॅलेगी यांच्या मते या खंडातील अश्वेत लोकांची ही पहिली फुटबॉल संघटना होती.
या खेळाची लोकप्रियता गांधीजींच्या लक्षात आली. हा खेळ पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसल्यावर, गांधीजी या खेळाचा वापर सामाजिक जागृतीसाठी करू लागले. ज्या वेळी सामने सुरू असत त्यावेळी गांधीजी प्रेक्षकांमध्ये फिरून पत्रके वाटत व त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या इनडोअर फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पुबालन गोविंदस्वामी यांनी ‘फिफा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या फुटबॉलप्रेमावर अधिक प्रकाश टाकला.
त्या काळी एकहाती विजय मिळवून देणा-या एखाद्या खेळाडूपेक्षा सांघिक भावना जपणा-या या खेळाची संकल्पना गांधीजींना अधिक भावली. संघ भावना म्हणजेच सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून देण्याची क्षमता या खेळात आहे, असे त्यांना वाटले. अधिकाधिक लोकांना हा खेळ एकत्र आणू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ व ‘क्लिप रिव्हर डिस्ट्रिक्ट इंडियन फुटबॉल असोसिएशन’ यांसारख्या लहान संघटना स्थापन केल्यावर १९०३ मध्ये ‘साउथ आफ्रिकन असोसिएशन ऑफ हिंदू फुटबॉल’ स्थापन करण्यात आली.

                                                                    महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील ‘टॉलस्टॉय’ आश्रमात फुटबॉल खेळला जात असे.

गांधीजी भारतात परतल्यानंतर मात्र त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले क्लब बंद पडले. तरीही भारतीय वंशाच्या लोकांनी इतर नवे क्लब सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल चालू ठेवले. दुसरीकडे भारतात परतल्यावर गांधीजींचे मतपरिवर्तन झाले. खेळांविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनात बदल झाला. भारतीयांनी खेळापेक्षा शेतीसारख्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते सांगू लागले. खेळ म्हणजे वेळ घालवण्याचे एक साधन आहे व भारतीयांनी शेतावर अधिक तास घालवले पाहिजेत आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये व त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतूनही त्यांचा खेळाविषयीचा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल संघटनांशी असलेले त्यांचे संबंध त्यांनी कायम ठेवले.

फुटबॉल

फुटबॉल : फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : 
                 १. असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि 
                 २. रग्बी.  
सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही; या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय. 


सॉकर (असोसिएशन फुटबॉल) : फुटबॉलच्या नियमांना व कायदेकानूंना अधिकृत रूप देण्यासाठी २६ जुलै १८६३ मध्ये लंडन येथे ‘फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली, त्याच वर्षी ‘असोसिएशन फुटबॉल ’ ही संज्ञा व तिचे बोलीभाषेतील रूप सॉकर’ हेही रूढ झाले. पुढील वीस वर्षात आधुनिक फुटबॉल चांगलाच स्थिरावला. १८८३ च्या सुमारास चेंडू सरकवण्याचे (पासिंग) तंत्र विकसित झाल्याने संघरचनेतही काही फेरफार झाले : एक गोलरक्षक, दोन पूर्ण-पिछाडी, तीन निम्‍न पिछाडी व पाच आघाडी खेळाडू अशी आधुनिक रचना अस्तित्वात आली. जगातला सर्वात जुना क्लब इंग्‍लंडचा ‘शेफील्ड फुटबॉल क्लब’ (१८५७) होय. इंग्‍लंडमध्ये सॉकरचा पहिला अधिकृत सामना १८६६ मध्ये लंडन विरूद्ध शेफील्ड या दोन क्लबांमध्ये झाला. १८७१ साली ‘फुटबॉल चॅलेंज कप ’ सामने सुरू झाले. याच सुमारास इंग्‍लंडमधील निरनिराळ्या फुटबॉल क्लबांतून धंदेवाईक खेळाडू खेळू लागल्यामुळे हौशी खेळाडूंची कुचंबणा होऊ लागली, म्हणून १८९३ साली हौशी खेळाडूंसाठी ‘फुटबॉल असोसिएशन अमॅच्युअर कप ’ सामने सुरू झाले. अल्पावधीतच हा खेळ जगभर लोकप्रिय झाला व त्याचे नियमन करण्यासाठी ‘फेडरेशन इंटरनॅशनेल दी फुटबॉल असोसिएशन ’ (एफ्‌. आय्. एफ्‌. ए.) ही जागतिक संघटना १९०४ साली पॅरिसमध्ये स्थापना झाली. या संघटनेमार्फत १९३० पासून विश्वकरंडक (वर्ल्ड कप) स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या. दर चार वर्षांनी भरणार्‍या या स्पर्धांमध्ये प्रमुख देशांचे राष्ट्रीय संघ भाग घेत असतात. सॉकरचा ऑलिंपिक सामन्यांमध्ये १९०८ पासून व आशियाई सामन्यांमध्ये १९५२ पासून समावेश करण्यात आला. १९५५ साली फक्त यूरोपीय देशांपुरत्या ‘ यूरोपियन करंडका’ च्या सामन्यांना प्रारंभ झाला.
सॉकर या खेळामध्ये अनेक प्रकारचे जागतिक विक्रम आजतागायत प्रस्थापित झाले आहेत. जागतिक अजिंक्यपदासाठी दर चार वर्षानी ज्या विश्वकरंडक स्पर्धा भरवण्यात येतात; त्यांत ब्राझीलने एकूण तीन वेळा अजिंक्यपद मिळविले व ‘ज्यूल्‌स रिमेट ट्रॉफी ’ कायमची पटकावली. त्यानंतर १९७४ पासून ‘एफ्‌. आय्‌. एफ्‌. ए. कप’ ठेवण्यात आला.


                    
                   जगद्वितख्यात फुटबॉलपटू पेलेचा भारतातील खेळ : कॉसमॉस वि. मोहन बगान, कलकत्ता, १९७७.

भारतात खेळला जाणारा फुटबॉल हा मुख्यत्वेकरून सॉकर या प्रकारचाच आहे. हा खेळ ब्रिटिशांनी भारतात आणला. प्रथम तो कलकत्त्यात खेळला गेला व तदनंतर इतरत्रही लोकप्रिय झाला. ‘ट्रेडर्स कप’ साठी १८८९ साली पहिल्या स्पर्धा खेळल्या गेल्या. कलकत्ता येथे ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’ स्थापना (१८९३ ) होऊन, तिच्या वतीने ‘आय्‌. एफ्‌. ए. शील्ड ’ ची स्पर्धा १८९३ पासून सुरू झाली. १८९१ पासून ‘रोव्हर्स’ करंडक  सामने सुरू झाले. त्यांत हैदराबाद पोलीस संघाने १९५० ते ५४ पर्यंत ओळीने पाच वर्षे अजिंक्यपद मिळविले. त्या स्पर्धेतला हा विक्रम अद्याप अबाधित आहे. कलकत्त्यापाठोपाठ हा खेळ मुंबईमध्ये रूजला.१९११ मध्ये मुंबईला ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन’ ही संघटना स्थापन झाली. ‘फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ ही मध्यवर्ती संस्था १९३७ साली स्थापन झाली व त्यामुळे भारतातील फुटबॉल स्पर्धांना सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले. १९४१ पासून राष्ट्रीय विजेतेपदासाठी ‘संतोष ट्रॉफी’चे सामने खेळले जाऊ लागले. याशिवाय ‘ड्युरंड कप’ व ‘डी. सी. एम्. (दिल्ली क्लॉथ मिल्स) कप’ या फुटबॉल स्पर्धाही महत्त्वपूर्ण आहेत. भारताने ऑलिंपिक सामन्यांत १९४८ मध्ये प्रथमच आपला फुटबॉल संघ उतरवला. १९५६ साली मेलबर्न येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. १९६२ साली जाकार्ता येथील आशियाई फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताला अजिंक्यपद मिळाले. चुनी गोस्वामी हा त्या संघाचा कप्तान होता. दरवर्षी आशियाई राष्ट्रांसाठी मर्डेका फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांत भारतीय संघ भाग घेतो. तसेच शालेय खेळाडूंसाठीही एक वेगळी आशियाई फुटबॉल स्पर्धा भरवली जाते. सध्याच्या उत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये महंमद अकबर व हबीब हे बंधू, श्याम थापा, इंदरसिंग, शबीर अली, बिडेश बोस, झेव्हियर पायस, सुरजीत सेनगुप्ता हे आघाडी खेळाडू प्रसिद्ध आहेत. बचाव फळीत खेळणारा गौतम सरकार आणि गोलरक्षक भास्कर गांगुली व शिवजी बॅनर्जी या खेळाडूंनीही नाव मिळवले आहे. यांखेरीज मानस भट्टाचार्य, फ्रॅन्सीस, नेव्हील परेरा इत्यादींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.